कानसेन
शाळा .... रामला मी प्ले ग्रुप ला घातलंच होतं त्यामुळे शाळा ही कन्सेप्ट त्याला नवीन नव्हतीच.. फरक एवढाच होता की ही मोठी शाळा आहे .. मोठे वर्ग .. मोठी जागा .. सगळंच भव्य दिव्य .!. त्याला पण आवडलं आणि मलाही आवडलं .. त्याच शालेय जीवन सुरु झाल्याचा मला आनंद तर आहेच पण एक टेन्शन सुद्धा आलंय .. करेल ना नीट.?. जमेल ना त्याला .?. टिपीकल !! शाळेत "आज काय काय शिकवलं ?" यावर मला कधीही उत्तर मिळत नाही .डबा खाल्ला का यावरही कधीतरी उत्तर मिळतं , पण कुणाचंही लक्ष नसता शाळेत शिकवलेले श्लोक , गाणी , गोष्टी.. एकटाच असताना तो म्हणतो , मी ऐकते ! फार मज्जा येते ऐकताना .. एकदा स्वयंपाकघरात काम करताना राम हॉल मध्ये गाडी पार्किंग खेळात होता आणि खेळता खेळता श्लोक म्हणायला सुरवात केली " मोरया मोरया मी बाण ताणें .. तुझीच सेवा कर कुण्या जाणे ... अन्याय माझे कोटीच्या कोटी.. मोरेश्वर आबा तू झालं छोटी ..!" माझे कान तिकडेच होते .आधी मला समजलं च नाही हा नक्की काय म्हणला .. "मी बाण ताणें ..?" हे नक्की कोणत्या श्लोकात आहे.. हा नक्की काय श्लोक आहे.. या श्लोकाशी मिळता जुळता श्लोक मला माहिती आहे, हा तोच श्लोक आहे का .. ?? कर कुण्या जाणे?? हे ".. करू काय जाणे" शी मिळतं जुळतं आहे.. म्हणजे हा तोच श्लोक आहे .. " मोरया मोरया मी बाळ तान्हे .. तुझीच सेवा ... !" माझी हसून हसून पुरेवाट झाली.. पण आता करावं काय.. ? चुकीचं म्हणतोय म्हणजे चुकीचं ऐकलं आहे आणि चुकीचं ऐकलेलं च लक्षात राहिलं तर ..?? मग मी रामच्या जवळ जाऊन बसले.. त्याला म्हणलं "चल माझ्या मागे म्हण" .. मग मी बरोबर श्लोक म्हणला .. तर या वर राम म्हणतो " तस नाहीये तू वेगळ म्हणतीये.. "मी बाण ताणें च आहे".. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या वर्गात हजर ! सगळा प्रकार टीचर ला सांगितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो चुकीचं ऐकतोय.. मग त्याला जवळ बसवून नीट श्लोक शिकवला टीचर नी .. आणि आता तो बरोबर म्हणतोय..
एकदा मी म्हणलं ,"तुला आवडलेली गोष्ट सांग ना मला एक.. मी कित्ती गोष्टी सांगते तुला .. तू पण एखादी सांग..!" कधी नव्हे ते तयार झाला आणि सुरवात केली.. " एक लाकूडतोड्या होता. तो झाडं तोडायचा आणि लाकूड विकून पैसे कमवायचा .. खूप पुअर होता .. एकदा त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली.. आणि तो खूप रडू रडू करायला लागला मग त्या विहिरीतून एक बेबी आली .." एवढा वेळ कौतुकाने नीट गोष्ट ऐकत असलेली मी त्याच्या शेवटच्या वाक्यावर एकदम दचकले .. मी विचारला "काय?? कोण आली?" यावर तो म्हणला "बेबी आली!!" मी परत विचारला " काय??" यावर तो परत म्हणला " आई बेबी आली ना..!!" मी म्हणलं " बेबी ??" तो म्हणला "हो!".. मग मी पुढची १० सेकंद हसण्यात घालवली .. त्याला म्हणलं अरे, "बेबी नाही देवी .. देवी आली !" यावर तो म्हणतो. " नाही गं आई बेबी च आलीये ना.. बेबी आली.. टीचर नि सांगितलंय ना.. बेबी येणार ते !!" मी अजून १०-१५ सेकंद मोठमोठ्याने हसण्यात घालवली.. " अरे बेबी कशी येईल..? बेबी म्हणजे बाळ ना..! " आता त्याच्या पण लक्षात आलं असेल की आपला काहीतरी चुकतंय.. असा मला वाटलं पण नाही.. तो एकदम आत्मविश्वासाने पुढची गोष्ट सांगू लागला .. "बेबी खाली जात होती , वेगळ्या वेगळ्या कुऱ्हाडी घेऊन वर येत होती.. सगळी कामं त्या बेबी नी केली गोष्टीतली.. अगदी आशीर्वाद देऊन सगळ्या कुर्हाडी देखील बेबी नीच दिल्या .!!. मी त्याला तेव्हा काही पटवून देऊ शकले नाही .. की ,"बेबी नाही देवी येते .. ती बाप्पा असते ना..!" तो काही मान्य करायला तयारच नाही.. मग मात्र मी सोडून दिला विषय.. जेव्हा वाचता येईल तेव्हा समजेल.. असा म्हंणून.
जगाचा नकाशा आणलाय मी त्याच्यासाठी खेळायला ..! पझल स्वरूपातला.!. छान आहे ..!. सगळे देश हळू हळू ओळखीचे होत आहेत आता .. मग आम्ही छान गोष्टी तयार करतो .. कधी कधी भारत कसा पोहत पोहत तिबेट ला जाऊन धडकला .. मग त्यांची मैत्री झाली ... अश्या मस्त गोष्टी तयार करून आम्ही खेळात असतो.. एकदा नकाशा लावताना मला विचारला ," आई बोरसे हॉस्पिटल चा झेंडा कुठाय?" .. मी विचारात पडले बोरसे हॉस्पिटल वर कधी झेंडा लावला.. आणि कुठला झेंडा.. जास्तीत जास्त भगवा लावला असु शकतो .. ! बोरसे चा झेंडा नाहीये रे .. ते हॉस्पिटल आहे देश नाहीये.. देशाचा च झेंडा असतो.. ! यावर तो म्हणला " आहे आई आहे.. मी शोधतो थांब .. दाखवतो मी !" असं म्ह्णून शोधून काढला आणि तो खरंच बोलत होता .. स्विस देशाच्या झेंड्यावर + च चिंन्ह आहे अगदी तसच जसं दवाखान्यावर असतं !आता यावर मी काय उत्तर देऊ.. समजेना मला .. तो खर बोलत होता आणि माझ्या ज्ञानात भर पडली होती!

Comments
Post a Comment