उन्हाळ्याची सुट्टी भाग- ४
अजून दीड एक महिना तरी शाळा सुरु होण्यासाठी आहे सकाळी सकाळी ब्रश करण्याची रेस लावली होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार सुरु होते की पाणी खेळण्या पेक्षा बाकीचे उपक्रम काही करता आले तर राम ला मजा पण येईल आणि मला पाणी वाचवता येईल त्याबरोबरच थोडी कामं कमी होतील अश्या विचारात असतानाच राम च्या हाताला स्वयंपाकघरातील हिंगाची डबी लागली आणि ती उलटी करून उघडणं त्याला सहज सोप्प गेलं परिणाम ... तोंडात ब्रश धरून खाली सांडलेलं हिंग गोळा करत होते मी !! तोंडातली पेस्ट आणि खाली सांडलेलं हिंग यांचं मिश्रण ना होऊ देता आणि कुणाच्याही पायाखाली यायच्या आत जेवढं शक्य होता तेवढा हिंग पुन्हा डबीत भरला आणि घरभर त्याच झाकण शोधत मी फिरत होते... !घाई घाईनी तोंड धुवून परत स्वयंपाकघरात गेल्यावर दिसलं रॅक मधले सगळे डबे राम नि खाली काढलेत आणि चमच्याने तो वाजवतोय ऑर्केस्ट्रा ....!! झाकण सापडला नव्हताच पण डबी मी वर ठेऊन दिली ...माझं थोडं स्वयंपाक घरातलं काम होईपर्यत वाजवू देत ... प्रणव नि दूध पाजणे , दात घासून देणे , शी धुणे हि काम करेपर्यन्त मी दूध तापवणे , नाश्त्याची तयारी करणे , आमच्यासाठी चहा बनवणे हि काम उरकली ... आणि आम्ही १० मिनिटे तरी निवांत चहा पियू या विचारांनी बसलो..!! ज्यांचं मूल ३ वर्षांचं आहे त्यांनी असे विचार पण करू नयेत असा नियम जर कुठे असला तर आम्हाला ती नियमावली पाठवा कुणीतरी ... आम्ही पाठ करून ठेऊ ना!!डबे खाली काढलेले असल्याने मोठ्या रॅक मध्ये आरामात चढता आलं राम ला रॅक च्या दुसऱ्या फळीवर चढून छोट्या रॅक मध्ये ठेवलेल्या मेतकुटाची छोटी डबी राम नि घेतली... मी लगेचच काढून घेतली हातातून !! विषयच संपवला.. मग मनुक्याचा डबा हाती आला त्याच्या .. मी म्हणलं मनुके खाउदेत.. त्यांनी काय होणारे.. म्हणून मी घेऊ दिला .. आणि पुढच्या कामाला लागले..
मनसोक्त मनुके एका जागेवर बसून खाऊन झाल्यावर राहिलेल्या मनुक्यावर जणू काही अन्याय होतोय अशा थाटात राम म्हणला " आता तुमचं काय करू मी?" मला ऐकू आल होत स्वयंपाकघरात हे वाक्य आणि मी म्हणलं हा कुणाशी बोलतोय..? येऊन बघितलं तर मनुक्याशी बोलत होता .. मी परत स्वयंपाक घरात वळले. नंतर मला घरभर मनुके दिसू लागले.. सिपर मध्ये .. बाथरूम मध्ये.. पांडा कार च्या बास्केट मध्ये.. आणि मनुक्याच्या डब्यात मनुक्याबरोबर पाणी देखील होत.. आता तेवढ्या ओल्या मनुक्याचं काय करायचं हे काही आम्हाला समजेना ...तरीपण मी ते मनुके शक्य तितक्या लवकर वापरून संपवलेच !! या सुट्टीत अजून एक मोठा आवडीचा काम मिळालं ते म्हणजे आंब्याची आढी लावायचं.. घरात सगळ्यांनाच आंबे आवडतात त्यामुळे राम आंबा प्रेमी होणारच होता यात काही शंकाच नव्हती.. त्याच्या आंबा प्रेमाची गंम्मत वाटते मला .. याबाबतीत तो माझ्यावरच गेलाय यात कोणीही शंका घेत नाही ! रामच्या नगरच्या घरी दारात आंब्याचं झाड आहे .. त्या झाडाच्या कैऱ्यांची अढी लावणं हे खूप मोठं काम असत दर वर्षी.. यावर्षी त्याने आजोबांना मदत केली आढी लावायला..


Comments
Post a Comment