पहिली उन्हाळ्याची सुट्टी - भाग १
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर खरंतर मला त्याला समर कॅम्प ला टाकावं असं खूप वाटलं होतं म्हणजे शाळेत जायची सवय पण मोडणार नाही आणि दिवसातले २-३ तास तो चांगल्या उपक्रमांमध्ये गुंतलेला असेल , माझं घरही २-३ तास स्वच्छ राहील पण या आजकालच्या समर कॅम्प आणि ऍक्टिव्हिटी सेंटर च्या फीया एवढ्या वाढवल्या गेल्यात ना कि तेवढ्या पैशात घरातच एखादं प्ले स्टेशन , व्हिडिओ गेम , हॉट व्हील्स चा सेट वगरे येईल. (आमच्या आईवडिलांसारखाच आम्ही पण विचार केला आम्हाला नाही मिळाला, पोराला घेऊन द्यावा !) २ दिवसात त्या प्ले स्टेशन चा प्ले एकीकडे स्टेशन भलतीकडे .... व्हिडिओ बाथरूम मध्ये ... गेम बेडरूम मध्ये... व्हील्स पायाखाली येऊन आमचं डोकं हॉट झालय असं काहीसं चित्र डोळ्यासमोर आलं आणि घेऊन द्यायच्या विचारांपेक्षा न घेऊन देण्यावर आमचं पटकन एकमत झालं ! आणि सगळेच विचार रद्द करून आलेली सुट्टी राम घरीच घालवणार असं ठरलं . तसं बघायला गेलं तर त्याची पहिलीच उन्हाळ्याची सुट्टी आहे ही आणि आई म्ह्णून माझीही !!
आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेजे काही करायचो ते सगळं राम नी पण करावं या माझ्या अतिअपेक्षांवर राम नी २ दिवसांतच पसारा घातला !! त्याच पसारा घालणं हे रोजच होणार आहे यासाठी माझ्या मनाची तयारी मी समरकॅम्प रद्द केल्यापासूनच करत होते पण ते आवरण्यासाठी देखील वेगळी मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल हे कुठं माहिती होतं . रोज नवीन काहीतरी उपक्रम राम ला द्यायचा असं मी ठरवलेलं होत पण आज कोणता उपक्रम हाती घ्यायचा हे मात्र त्याच तोच ठरवतो आणि रोज मला आवरायला नवीन उपक्रम तोच देतो...
एका रविवारी ठरवलं कि त्याला कुंडीत रोप लावायला शिकवू , काळी माती , रोप कुंडी सगळं साहित्य घेऊन आम्ही बसलो.. छान रोप लावला त्यांनी पण नंतर त्याला पाणी घालायच्या वेळेस याच्या डोक्यात पण खोड्यांची रोप उगवली होताहोता.. कुंडीत पाणी घातलाच पण काली माती खाली घेतली त्यात पाणी घातला नीट चिखल केला तो आमच्या गॅलरी मधल्या पांढऱ्या शुभ्र फरशीवर सारवला त्यामध्ये बोटानी चित्र आणि रेघोट्या ओढत बसला होता मग थोड्यावेळानी आत येऊन तेच चिखलानी बरबटलेले हात सोफ्याला पुसले , मग तसाच मला आणि प्रणवला पण रंग लावल्यासारखा चिखल लावायचा होता त्याला !! त्याचा उपक्रम आमच्या चांगलाच अंगलट आला होता. आम्ही ठरवलं कि त्याला काय करायचं ते करू देत आपण थोडा आराम करू नाहीतरी १० वेळा आवरण लागतंय एकदाच काय तो पसारा आवरून ठेवू , असा विचार करून मी आणि प्रणव नि रामाकडे दुर्लक्ष केलं , या मुलांनी आमचं लक्ष नाही असा बघून फारशी बरोबर त्याची निळी सायकल देखील चिखलानी लिंपून काढली इतकी छान एकसारखी लिंपली होती जणू काही ब्रश नि पैंटिंग केलंय , पसारा आवरायला भरपूर प्रमाणात शक्ती आणि पाणी सुद्धा लागलं आम्हाला आमच्या उपक्रमाचे एवढे भव्य स्वरूपात रूपांतर होईल असा वाटलं नव्हतं तेव्हा मातीशी संपर्क येईल अशी ऍक्टिव्हिटी नको द्यायला यावर आमचं एकमत झालं . राम चा वेळ इतका छान गेला दिवसभर थोडा थोडा चिखल तो खेळतच होता, दुसऱ्या दिवशी गॅलरी घासणी नी घासून पाणी टाकून धुवून काढली .

Comments
Post a Comment