ब्रदर शार्क आणि बेबी शार्क

"अनय माझा छोटा भाऊ आहे ! मी अनय चा दादा आहे " हे राम च्या डोक्यात इतकं पक्कं आहे की "अनय  बेबी शार्क आहे आणि मी ब्रदर  शार्क आहे !!" असं  तो मला नेहमी म्हणतो. मलाच काय पण त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांना, सोसायटी मधल्या मैत्रिणींना आणि मामाच्या घरी देखील सगळ्यांना  हेच सांगून ठेवलंय .त्यामुळे अनय  कोणालाही ओळखू दे किंवा न ओळखू दे,आमच्याकडे अनय ला सगळे ओळखतात. रामचा  प्रचंड जीव आहे त्याच्या अत्त्येभावावर .या भावंडामध्ये तस वर्षभराचच अंतर आहे त्यामुळे या दोघांचं एकमेकांशी छान जमेल असं मला आणि प्राचीला वाटतं . खोड्या काढण्यामध्ये अनय  जरा मागे असतो पण आपला दादा जे काही करतोय ते तो नीट लक्ष देऊन बघत असतो . रांगत जाऊन  हळूच जाऊन अनय नी फ्रिज उघडलेला पाहून चालत चालत  राम पण तिकडे गेला वरच्या बाजूच्या कप्प्यातून मसाल्याची पाकीटे  बाहेर काढायला सुरवात केली ते बघून अनय खालच्या कप्प्यातून बाकीच्या वस्तू बाहेर काढू लागला .दोघंही नुसतच काढत असते तर ठीक होतं  पण बाहेर काढून फेकून देत होते दोघं हुशार ! मी तिथे पोहोचेपर्यन्त फ्रिज च्या दाराचे खालचे तिन्ही कप्पे रिकामे झालेले होते.  आणि सगळ्या वस्तू हॉल भर पडल्या होत्या. नक्की कोणाला आवरावं या संभ्रमात असताना प्राची मदतीला आली आणि आमच्या पोरांनी भागीदारीत केलेला पसारा आम्ही भागीदारी करूनच आवरला . 


एकदा आमच्या मित्राच्या  साखरपुड्या निमित्ताने नगरला एकत्र जाण्याचा योग्य आला , मित्राचे काही नातेवाईक आमच्याकडे झोपायला आले होते . हे दोघे रात्रीच्या वेळी सुद्धा एकदम उत्साहात होते.  खेळायचं होतं  त्यांना ! ओरडायचं होतं ! त्या दिवशी दोघांनी एकत्र कोकाटु नावाचा पक्षी बघितला होता त्यांना इतका आवडला होता तो. त्याच्यासारखाच आवाज काढून बघत होते .  एका नंतर एक असे एकदा राम त्याचं ओरडून झालं की अनय मोठ्या  मोठ्यानी ओरडणं चाललेलं  होतं  ते पण रात्री १०:३० वाजता . मला ते बघून खूप मज्जा येत होती . राम जागा आहे म्हणून अनय झोपत नव्हता ,अनय जागा आहे म्हणून राम झोपायला येत नव्हता नुसता कल्ला चाललेला  होता दोघांचा !! दिवाणखान्यात मात्र  शांत झोप मिळण्याच्या अपेक्षेने आलेले सर्व पाहुणे या  दोघांच्या ओरडण्यामुळे अगदी हतबल झाले होते. शेवटी प्रणव नी राम ला उचलून दुसऱ्या खोलीत नेलं,  मग आमची ओरडण्याची जुगलबंदी संपली आणि सगळे झोपले . त्या मित्राच्या लग्नाच्या वेळेस मात्र आमच्याकडे त्याचे कोणीही नातेवाईक राहायला आले नाहीत! 


एकदा अशीच तोंडानी फुरक्या काढण्याची स्पर्धा सुरु झाली होती दोघांमध्ये, एकमेकांच्या जवळ जाऊन जीव खाऊन फुरक्या काढत होते तोंडातून , सुरवातीला मला ते बघून गम्मत वाटत होती मी पण मजा बघत होते. दोघंही एकमेकांवर  फुरकी काढून झाल्यावर खूप हसत होते,   पण नंतर तोंडातून हवेबरोबर थुंकी सुद्धा बाहेर पडू लागली मग मी त्यांना नको म्हणायला सुरवात केली,  तोपर्यंत मज्जेचा उचांक गाठलेला होता दोघांनी कोण ऐकणार माझं ?? त्यांना आवरता आवरता माझ्या तोंडाला फेस येऊ लागला ... मधेच रामला काय वाटलं कोण जाणे त्यानी माझ्यावर फुरकी मारली , ते बघून अनय ला इतका हसू आलं की चिडलेली मी त्याच हसणं बघून हसू लागले , मग अनयनी माझ्यावर फुरकी मारली.. राम  खो खो हसू लागला , यात जास्त मज्जा येतीये याची लगेच जाणीव झाली दोघांना !! मग काय ? न मी त्यांना अडवू शकले ना मला कोणी वाचवायला आलं ! ५ मिनीटांनी मी आवाज चढवल्यावर माझ्यावरचा तो पाऊस थांबला ! पण या दोघांचं हसणं काही थांबलं नाही. 

पसारा घालणे , पाणी खेळणे , माती खेळणे , कार खेळणे या गोष्टी अनय आत्ता करीत नसला तरी रामच  बघून तो नक्की करणार याची मला खात्री आहे , दोघांचे मूळ स्वभाव खूप वेगळे आहेत तरीही दोघांमध्ये खुप छान नातं निर्माण झालेलं आहे ते असंच फुलेल अशी अपेक्षा आहे . त्या दोघांचे अजून खुप किस्से असावेत माझ्याजवळ जे मी त्यांच्या मुलांना सांगू शकेन. 


Comments

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

रामची सायकल