खरेदी आणि राम

पहिल्यांदा राम ला एका सुपरशॉप मध्ये घेऊन गेलो होतो, जिथे ट्रॉली मधून सामान घेऊन शेवटी बिल करायचं असतं. राम नी पहिल्यांदाच बघितलं होतं की सगळ्या वस्तू आपल्या उंचीएवढ्या जागेवर आहेत आपण हव्या त्या घेऊ शकतो मी बास्केट घेतली, त्यालापण त्याची वेगळी हवीच होती म्हणलं काय हरकत आहे,आम्ही घेऊ दिली तो शांतपणे बास्केट ढकलत ढकलत चॉकलेट्स आणि कॅडबरी ठेवलेल्या रॅक जवळ गेला आणि एक-एक कॅडबरी उचलून बास्केट मध्ये भरू लागला मी हवं ते सामान घेऊन बिलिंग कॉउंटरपाशी आले तो पर्यन्त या साहेबांचं अर्धं रॅक बास्केट मध्ये टाकून झालं होत प्रणव त्याच्याकडे कौतुकाने पाहत होता आणि दुकानातली बाकीची लोकं त्या दोघांकडे हसून पाहत होती ! "यातलं एकच न्यायच आहे बरंका आपल्याला !" माझ्या या वाक्यावर राम नी  फक्त माझ्याकडे बघितलं आणि तो पुन्हा चॉकलेट्स भरण्यात मग्न झाला. मला आणि प्रणव ला कळून चुकलं  होतं की  हे इतक्या सहज संपणारं नाहीये. आता याच रूपांतर रडारड ,गोंधळ यात ....  ते पण सार्वजनिक ठिकाणी होणार आहे. दुकानातल्या बाकीच्यांना पण हे लक्षात आलं होतंच . तरीपण मी शक्य तितक्या शांततेत आपल्याला बाहेर पडायच् यासाठी प्रयत्न करत होते.आता एकावरून मी "यातले पाच घेऊन जाऊ हां चालेल? " वर पोहोचले होते , आमचं बिलिंग पूर्ण झालं होतं पण राम बास्केट सोडायला तयार नव्हता " ते बघ बाहेर काय आलंय ....!" असं म्हणत मी त्याला उचललं आणि त्यानी रडायला सुरवात केली, पुढचा तासभर आमचा (आणि आम्हाला बघणाऱ्या लोकांचाही ) कसा गेला ते आम्हालाही समजलं नाही. 

सार्वजनिक ठिकाणी या तिसऱ्या वर्षात पदार्पण केलेली मुलं अचानक वेगळीच वागायला लागतात.  अचानकपणे  त्यांच्यातली भिती कमी होऊन उत्सुकता वाढायला लागलेली असते ' आईला सोडून कसं राहू ' वाली भावना गायब होऊन 'आई तू इथंच थांब मी ते काय आहे बघून येतो... ' अशी भावना वाढू लागते.  मोठ्यांचा  हात सोडून पळणे , वस्तू पाडून बघणे , त्यांना हात लावून बघणे या गोष्टी वाढायला लागतात . रामची आत्या त्याला पीटर इंग्लंड च्या शोरूम ला घेऊन गेली होती , सोबत मी आणि प्रणव नव्हतो ,आज्जीआजोबा होते आणि त्याचा आत्तेभाऊ होता तो २ वर्षांचा गोडुला आहे ,त्या दिवशी दुकानात फार गर्दी नव्हती पण सगळ्या स्टाफ ला या दोघांनी कामाला लावलं! तिथले सगळे पुतळे रामनी हलवून, बघितले त्यांना हात लावून बघितला, त्यांना मिठी मारली आणि  हाताला लटकून पण झालं म्हणे !! तिकडच्या कपडे बदलण्याच्या खोलीत जाऊन आला आरश्यासमोर उभं राहून हावभाव केले. एका खोलीत कोणीतरी आत गेलं...राम ला वाटलं त्याचे अजोबा आहेत, ह्यानी बाहेरून जोर जोरात ते दार बडवायला सुरवात केली, मागून येऊन आजोबानी उचललं त्याला. (आतल्या व्यक्तीची प्रतिक्रिया काही कळू शकली नाही मला !!) त्याच्या हाताला येतील तेवढे सगळे कपडे खाली फरशीवर काढले अवघ्या काही मिनिटांत !! या सगळ्या उद्योगांमध्ये त्याचा छोटा भाऊ त्याच्या मागे मागे... त्याला पण मज्जा येत होती !! रामला आवरता आवरता सगळ्यांचीच दमछाक झाली. आज्जीआजोबांकडून राम चे हे उद्योग ऐकताना माझी मात्र हसून हसून पुरेवाट झाली!! 

एकदा मी रामला दुकानात घेऊन गेले होते तिथे रॅक मधलं टोस्ट च पाकीट उचलून सरळ गाडीच्या दिशेनी पळ काढला रस्त्याकडे! मी काहीही न घेता तशीच त्याच्या मागे धावत सुटले त्याला पकडायला, दुकानदार व इतर सगळे माझ्याकडे बघत होते.. गाडीजवळ तो पोहोचला आणि जोरात ओरडला " आई ये .... डिक्की मध्ये हे ठेवायचंय " मी म्हणलं " अरे पैसे नाही दिले याचे , हे नव्हतं घ्यायचं आपल्याला " यावर तो म्हणला " तू जी पे कर ना, चल लवकर मला घरी जाऊन फोडून दे !" जे घ्यायचं होत ते न घेताच आमची वरात घरी आली. सार्वजनिक ठिकाणचा हट्टीपणावरचे मी जेवढे व्हिडिओ बघितलेत त्यापैकी फारसा राम करत नाही त्याची पद्धत जरा वेगळी आहे असं वाटतं .यावरची तुमची मतं नक्की मला कळवा . 

Comments

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

रामची सायकल