लांब फिरायला .....
"राम कुठे जायचं ?" असं विचारलं कि एकच उत्तर यायचं त्याच्याकडून... "लांब फिरायला..!" पण किती लांब ते मात्र आम्हीच ठरवत होतो ! १ ते २ वर्षांच्या मुलांना प्रवासाला घेऊन जाणे म्हणजे खूप डोकेदुखी ! असा सल्ला मला जवळ जवळ सगळ्यांनी दिला. बाबा तर म्हणाले, " सहल फक्त २० % तुमची असेल ते पण पोरं झोपल्यावर आणि उरलेली ८०% फक्त पोरांची असेल ,यात त्याचे मूड्स त्यांचा कम्फर्ट त्यांचं खाणं, पिणं, झोपणं आणि खेळणं, खेळताना त्यांना सांभाळणं सगळंच.... ! आणि तुम्ही दोघेच असाल आणि आपलं हे वादळ कसं हे तुला तर नीट माहितीय !!" पण मला मनापासून काही पटत नव्हतं मला तो अनुभव घ्यायचाच होता, खरंच इतकी डोकेदुखी असेल का? होईलही किंवा होणार पण नाही ! आम्ही निर्णय घेतला जाऊयात ... आमच्या सगळ्यात जवळचे मित्र मैत्रीण आणि त्यांची ८ महिन्याची मुलगी देखील आमच्या सोबत होते. हि सहल खरंतर मुलांपेक्षा आमच्यासाठी महत्वाची होती कारण पोरं झाल्यापासून घराबाहेर पडलोच नव्हतो , निवांत वेळच घालवता आलेला नव्हता , पण ती मुलांसाठी जास्त महत्वाची ठरली .
तशी खूप तयारी करून गेलो होतो मनाची आणि मुलांच्या सामानाची, त्यांची खायची -प्यायची ,आजारपणाची देखील . रामचा पहिला विमान प्रवास , तो सुरवातीला म्हणजे विमानतळावर, अगदी विमानात चढून बसेपर्यंत खूप उत्साहात होता पण विमान उड्डाण केल्यानंतर मात्र मला आणि प्रणवला बिलगून बसला होता. नंतर मात्र आपण ढगांच्या वरून चाललोय हे खिडकीतून बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मी नुसती बघतच राहीले , मोबाइल काढून टिपून घ्यायचं माझ्या लक्षातच नाही आलं. म्हैसूर च्या हॉटेल वर गाडीतून खाली उतरल्याबरोबर राम जोरात पळत सुटला रस्त्यावर मी खाली उतरून त्याच्यामागे जाईपर्यंत तो गेट जवळ पोहोचला होता , मी अजून जोरात पळाले आणि त्याला पकडलं त्याला जवळ घेतल्यावर बाबांनी उच्चरलेले सगळे शब्द कानात घुमले आणि निवांतपणा साठी आखलेली सहल साहसी होणार याचा छोटासा ट्रेलर मिळाला ! खोल्यांची मोठी लॉबी पहिल्यांदाच बघितली होती त्याने, पहिल्यांदा घाबरला , मग नुसता पळत सुटला खोल्यांच्या एका चौकापासून पासून शेवटच्या चौकापर्यंत आणि त्याचा मागे कधी मी कधी प्रणव ! खोलीत गेल्यावर सगळ्याला हात लावून बघायचा होता त्याला ,अगदी बेसिनला देखील ! हेअर ड्रायर हि गोष्ट त्यांनी पहिल्यांदा बघितली होती, आम्ही जेवढा वेळ रूम मध्ये होतो तेवढा सगळा वेळ हेअर ड्रायर खेळत होतो, अगदी झोपेपर्यंत !आजपर्यंत इतक्या जवळून रेल्वे रामने कधीच बघितली नव्हती, आणि तो कधी कुठल्या टॉय ट्रेन मध्ये बसला नव्हता म्हैसूर च्या रेल्वे संग्रहालयातली टॉय ट्रेन ची सफर दोन्ही मुलांनी इतकी एन्जॉय केली कि पहिल्याच दिवशी सहलीला यायचं सार्थकी लागलं असं वाटलं . दोन्ही पोरांच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा यांना प्राधान्य देऊन आम्ही दिवसाची आखणी करीत असू, त्यामुळे पोरांची झोप आणि जेवण वेळेत नीट झालं कि त्यांचा त्रास देणं किंवा किरकिर करणं असं काही फारसं झालं नाही. म्हैसूर च्या प्राणी संग्रहालयात राम ला किती बघू आणि किती नको असं झालं होतं . वाघोबा बघायचा होता आम्हाला मोठा , पण तो झोपला होता , चित्ते आणि त्याची पिल्लं जागी होती फेऱ्या घालत होती त्यांना बघितल्यावर म्हणला, "हा मोठा वाघोबा नाहीये !!" एक माकड बाहेर पळत होतं ह्याला त्याच्याच मागे जायचं होतं त्यावरून मात्र रामनी इतका गोंधळ घातला , इतकी रडारड केली पूर्ण सहली मधली कसर एकदाच भरून काढली. हॉटेल मधल्या पोहण्याच्या तलावापासून दोघा मुलांना लांब ठेवण्यात आम्ही कसे बसे यशस्वी झालो , तेव्हा पण राम नि खूप रडारड केली , अगदी त्याचं आम्ही ऐकलंय असं दाखवायचं म्हणून पाय बुचकाळू दिले त्याला त्याचं समाधान झालंच नव्हत तरी नादी लावलं ! कूर्ग च्या हॉटेल मध्ये किड्स प्ले एरिया मध्ये त्यांनी जो काही दंगा केला तेव्हा आपली सहल पैसे वसूल झालीये अशी भावना झाली .
त्याची पहिली सहल, पहिला विमान प्रवास कायम लक्षात ठेवण्या एवढा तो मोठा नक्कीच नव्हता , पण त्याची ही पहिली सहल माझ्या मात्र कायम लक्षात राहील , त्यांनी केलेली मज्जा तो दुसऱ्या दिवशी विसरला असेल कदाचित, आज त्याला काही विचारलं तर आठवणार नाही कदाचित पण मला ते कधीच विसरता येणार नाहीत अश्या आठवणी आहेत. देव करो त्याच्या नशिबात भरपूर अश्या सहली लिहिलेल्या असूदेत त्याला खूप फिरायला मिळू देत सगळं जग बघायला मिळू देत ... आणि त्याच्यामुळे थोडंफार मलाही मिळू देत !!

Comments
Post a Comment